शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
खामगाव (प्रतिनिधी) : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून महिन्यात एकाच वेळी पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे रेशन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना 30 जूनपर्यंत तीन महिन्यांचे रास्तभाव दुकानातून धान्य उचलावे लागणार आहे.
यावर्षी अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा पाऊस महिनाभर अधूनमधून सुरूच होता. तसेच मोसमी पाऊस सुरू झाला आहे. या पावसानेही दमदार सुरुवात केली. जिल्ह्यात अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. अजूनही सतत पाऊस सुरूच आहे. दरम्यान, पावसामुळे रेशनचे धान्य मिळण्यात लाभार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांसाठी एकदाच रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना पुढील दोन महिने पावसापाण्यात भिजत रेशन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांत्ूान जून, जुलै व ऑगस्टचे तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते. यामुळे शिधापत्रिका धारकांना रेशन मिळवण्यासाठी अडथळे येतात. यावर्षी अशा त्रासापासून नागरिकांना वाचवण्यासाठी पुरवठा विभागाने ही योजना आखली आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला तीन महिन्यांचे धान्य मिळणार आहे, यात गहू, तांदुळ व डाळ आदींचा समावेश आहे. जून महिन्यातच शिधावाटप केंद्रांवरून जुलै आणि ऑगस्टचे धान्यही वाटप करण्याचे निर्देश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेत स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले रेशन उचलावे लागणार आहे.
मान्सूनसाठी खास नियोजन- पावसाळी हंगाम जवळ आल्याने, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अन्नधान्य पुरवठ्यात बाधा येण्याची शक्यता आहे. या आव्हानांचा विचार करून प्रशासनाने हा दूरदर्शी निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात परिवहन व्यवस्था विस्कळीत होते., मार्ग बंद होतात व रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवणे कठीण होते. अशा वेळी लाभार्थ्यांजवळ आधीपासूनच तीन महिन्यांचा पुरवठा असल्यास, त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
फायदे – या नव्या पद्धतीमुळे राशन कार्डधारकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. प्रथम, दरमहा रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाहीशी होईल. दुसरे, पावसाळ्यात घराबाहेर पडण्याची गरज राहणार नाही. तिसरे, वेळ व पैशाची बचत होईल. चौथे, घरात तीन महिन्यांचा धान्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने अन्नसुरक्षा मजबूत होईल.
