धोंडुजीचा मृतदेह पाहून कुटूंबीयांनी फोडला टाहो
खामगाव(प्रतिनिधी)ः घारोड-अकोली नाल्याच्या पुरात 27 मे रोजी वाहून गेलेल्या घारोड येथील वृद्धाचा मृतदेह तीन दिवसानंतर आज 30 मे रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घारोड शिवारातील साठवण तलावाच्या भिंतीजवळ झाडाझुडपात अडकलेल्या अवस्थेत दिसुन आला. धोंडुजी यांचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव शहर व तालुक्यात 27 मे रोजी सायंकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्या-नाल्यांना पुर आला होता, तर घारोड येथील धोंडुजी भगवान इंगळे व राहुल मधुकर इंगळे हे दोघे सायंकाळी दुचाकीने शेतातून घरी परत येत असतांना घारोड-अकोली नाल्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पुराच्या पाण्यात वाहत गेले. राहुल इंगळे याला पोहता येत असल्याने तो बचावला. तर धोंडुजी इंगळे पुरात वाहून गेले. या घटनेनंतर ना. आकाश फुंडकर यांच्या आदेशाने प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने वृध्दाचा शोध घेणे सुरू केले होते. परंतु धोंडुजी यांचा दोन दिवस उलटूनही शोध लागला नव्हता. आज 30 मे रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास धोंडुजी इंगळे यांचा मृतदेह घारोड शिवारातील साठवण तलावाच्या भिंतीजवळ झाडाझुडपाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. यावेळी इंगळे कुटुंबियांनी एकच आकोश केला. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा केला.
