आधार, ई-सेवा केंद्रांत नागरिकांची लूट

प्रशासनाची डोळेझाक, तिप्पट-चौपट रक्कमेची केली जाते आकारणी
खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव तालुक्यातील ई-सेवा केंद्रांत विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शासकीय शुल्क निश्चित केले आहे. मात्र त्याच्या तिप्पट, चौपट रक्कम नागरिकांकडून आकारली जाते. विचारणारे कोणीच नसल्याने केंद्रचालकांची मनमानी सुरू आहे. कागदपत्रे मिळावी, यासाठी सुरू असलेली धावपळ आणि कारवाईबाबत अनास्था याचा नेमका फायदा घेत काही केंद्रचालकांचा लुटीचा धंदा जोरात आहे. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. तक्रार आल्यानंतरच याप्रकरणी कारवाई करणार का, असा सवाल होत आहे.
नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. यामध्ये ठरावीक कालावधीनंतर दुरुस्ती करण्याची आवश्यकता असते. तसेच अनेक नागरिकांच्या आधार कार्डवर झालेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्या लागतात. याकरिता आधार केंद्रांत कोणत्या कामांसाठी किती शुल्क आकारावे, हे निश्चित आहे. मात्र, काही आधार केंद्रांत शासकीय शुल्काच्या तिप्पट, चौपट रक्कम आकारली जात आहे. केंद्रात आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा फलक दर्शनी भागात लावणे, नागरिकांना शुल्क आकारणीची पावती देणे बंधनकारक असतानाही बहुतांश केंद्रचालक नागरिकांना अशी पावती देत नाहीत. याबाबत कोणी विचारणा केलीच, तर अनेक कारणे सांगून शासकीय शुल्कासह जादा रक्कम का आकारावी लागते, याची पटणारी कारणेही देऊन केंद्रचालक मोकळे होतात. यामुळे नागरिकांची लूट सुरूच आहे. केंद्र मंजूर एकाला, चालवतो दुसरा आधार केंद्रासाठी नियम आहेत. त्यानुसार ज्याच्या नावे केंद्र मंजूर झाले आहे, त्यालाच ते चालवायचे आहे. मात्र, काही केंद्रे ही ज्याच्या नावे मंजूर आहेत, त्यापेक्षा दुसऱ्याच कोणीतरी चालवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आधार केंद्रांसाठी जागा निश्चित केल्या जातात, त्या सोडून खासगी जागेतही केंद्र चालवत असल्याचे प्रकार खामगाव तालुक्यात घडत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment