भारतीय समाजव्यवस्थेचा गहन अभ्यास करणारे चिंतन, मनन आणि अनेक मतांचे अभिसरण करून एकसंघ समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणारे गेल्या शतकातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव घेता येते. शिक्षण, समानता आणि न्याय या सिद्धांतांच्या त्रिसूत्रीवर त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच केलेले चिंतन म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेच्या परिवर्तनाचा एक मोठा ध्यास ठरतो. ज्या काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या अनेक प्रकारच्या चळवळी जोरात होत्या. त्या काळात स्वातंत्र्य या मूल्याचे तितकेच मूलगामी चिंतन बाबासाहेबांनी केले होते. ब्रिटीशांच्या जुलमातून भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. परंतु एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता येत असताना प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारी सर्व प्रकारची समता ही त्याच स्वातंत्र्याचाही अविभाज्य भाग ठरते. म्हणूनच त्यांनी आर्थिक विषमता दूर करण्यावर विशेषत्वाने भर दिला. याच विषयावरचा त्यांचा अमेरिकेतला प्रबंध महत्वपूर्ण ठरतो. कारण इंग्रजांची जुलुमशाही नष्ट जरी झाली तरी माणूस म्हणून जगण्याचे जे हक्क नाकारले जातात. त्या सामाजिक विषमतेची गुलामगिरीही संपली पाहिजे. तरच त्या स्वातंत्र्याचे संवर्धन होऊ शकेल. बाबासाहेबांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहात असताना त्यांच्या विचारांचा वेध आणि विचारांवरचा विश्वास अधिक भक्कम करण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अभ्यास करून विचार व्यक्त केले आणि ते विचार केवळ आश्वासने नव्हती तर सर्वसामान्य माणसाचा विश्वास संपादन करणारी होती. शिक्षणाचा प्रसार आणि मनुष्य म्हणून जगण्याचे सर्व प्रकारचे अधिकार प्रत्येकाला उपलब्ध झाले पाहिजेत. या विचारांवर विश्वास ठेवून जर कृती केली तरच ते प्रत्यक्षात येऊ शकतील आणि आचरणात आणला जाणारा विचार प्रत्येकावरचा अन्याय दूर करणारा असेल याबद्दलही बाबासाहेबांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या 21 व्या शतकात आपण वावरतो आहोत, तंत्रज्ञानाने आपल्याला सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु तेवढ्याने भागणार नाही. कारण विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य असणे म्हणजेच त्याला आपल्या जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळणे तितकेच गरजेचे आहे जे आज होताना दिसत नाही. समतेच्या विचारांसाठी समाजात सुधारणा घडवायची असेल किंवा समाजातल्या काही घटकांवरचा अन्याय दूर करायचा असेल तर सर्वप्रथम समाज अधिकाधिक साक्षर आणि सुशिक्षित झाला पाहिजे. शिक्षणातून व्यक्तिगत जाणीवांबरोबरच सामाजिक उणिवांचेही भान येऊ लागते. प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर अन्याय होऊ नये असे वाटते. किंवा आपल्याला समान वागणूक मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण ती मिळणार कशी. तर त्यासंदर्भातल्या घडामोडी किंवा आवश्यकता त्याला पूर्णपणे माहीत असल्या पाहिजेत. शिक्षणातून या गोष्टी शक्य होतात. म्हणजेच अन्याय करणाऱ्यालाच समोरची व्यक्ती जागृत आहे हे लक्षात येते. आणि अन्याय करण्याची संधी मिळत नाही किंवा होणारा अन्याय परतवून लावता येऊ शकतो. अशा व्यापक उद्देशाने स्वतः बाबासाहेबांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले आणि आपल्या सामाजिक कार्याची दिशा ठरवताना त्यांनी शिक्षणाच्या प्रसारालाही महत्व दिले. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था असतील किंवा वेगवेगळ्या सुधारणा चळवळी असतील यामधून त्यांनी आपल्या अनुयायांना शिक्षणाचे व्यसन लावून घ्या असेच आवाहन केले होते. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार हा खऱ्या अर्थाने तळागाळातल्या समाजघटकांचे उत्थान घडवून आणणारा ठरतो. ज्यामधून समता आणि बंधुतेचे मूल्य वृद्धींगत करण्याचा प्रयत्न झाला. समतेच्याबाबतीतही त्यांनी जोपर्यंत आर्थिक विषमता दूर होत नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही असे निक्षून सांगितले होते. मग अगदी संविधानाची निर्मिती करतानादेखील सर्व प्रकारच्या समान संधी लोकांना मिळाल्या पाहिजेत. यावर भर दिलेला पाहायला मिळतो. त्यांच्याकडे असलेला विद्याव्यासंग हा खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रवर्तकाचा व्यासंग होता. जगातल्या अनेक चळवळींचा अभ्यास करीत असताना भारतीय समाजाची मानसिकता त्यांनी जवळून पाहिलेली होती. आणि म्हणूनच आपल्य देशातील वंचित किंवा दुर्लक्षित समाजाला कोणतेही परदेशी मॉडेल चालणार नाही. तर इथल्या भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थितीचा विचार करूनच प्रत्येक समाजघटकाचा विचार केलेला त्यांनी दिसून येतो. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि विविधता असलेल्या देशात एकता टिकवायची असेल तर बाबासाहेबांच्या या शिक्षण आणि समानतेच्या सिद्धांताचे अनुकरण अनिवार्य ठरते. विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवून आर्थिक विषमता दूर करणारी समता प्रस्थापित झाली पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यांच्या विचारांचे हे प्रत्यक्ष अनुकरण तेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरू शकते. दुर्दैवाने सरकारी पातळीवर नुसत्या घोषणा होत राहातात. प्रत्यक्ष वंचित घटकांपर्यंत त्या योजनांचे लाभ पोहचवले जात नाहीत. ज्या महापुरूषाने पुढची अनेक शतके पुरेल अशा प्रकारची व्यवस्था सांगून ठेवलेली आहे. त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था निर्माण होईल अशा प्रकारचा पुढाकार सरकारी पातळीवरून घेतला गेला पाहिजे. समाज परिवर्तनाचे चक्र गतिमान करणाऱ्या या युगपुरूषाला विनम्र अभिवादन! लेखक-मनोज जाधव (संपादकःसाप्ताहिक गावाचा प्रश्न)
