खामगाव (गावाचा प्रश्न नेटवर्क न्युज) ः मागील दहा दिवसापासून विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाला खामगाव शहरात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूत मोरया..पुढच्या वर्षी लवकर या!“ जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, जंगी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत खामगाव शहरातील शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 17 व शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 12 असे एकूण 29 गणेश मंडळांचा सहभाग होता. शहरात गणेशभक्तांची सर्वत्र गदच गद झाल्याचे दिसून आले. खामगावच्या प्रसिद्ध असलेल्या मानाच्या लाकडी गणपतीला विजर्सन मिरवणुकीमध्ये विशेष महत्व असते. अव्वलस्थानी श्री मानाचा लाकडी गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ ही चार मंडळ दरवष मिरवणुकीच्या आधी असतात. त्यानंतर इतर गणेश मंडळाचे लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबरनुसार एकुण 29 गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
शहरातील विविध मंडळांनी आकर्षक सजावट व देखाव्यांसह गणेश मूर्तींची स्थापना केली होती. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम पथकांनी वातावरण भारून टाकले. महिला, पुरुष आणि लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.
पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन शहरातील कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. काही भक्तांनी घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच जलकुंडात करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. गणेशोत्सव काळात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा दिसून आला. खामगावकरांनी एकात्मतेने हा उत्सव साजरा करून परंपरेला आधुनिकतेची जोड दिली.
