राज्यात वाढणार थंडीचा कडाका; बुलडाणाचा पारा 12.6 अंशांवर


बंगालच्या उपसागरात शुक्रवारी दुपारी फेंजाल नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे वादळ शनिवारी दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे राज्यात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढणार आहे.
शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फेंजाल या चक्रीवादळाची निर्मिती झाली, त्यामुळे दक्षिण भारताच्या किनारपट्टीला अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. हे वादळ शनिवारी कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे, तर उत्तर भारतात शुक्रवारीच नवा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला, त्यामुळे उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी, तर दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस राज्यात थंडीसह दाट धुक्याचा कहर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हे चक्रीवादळ शुक्रवारी श्रीलंकेजवळ होते. त्याचा वेग 60 ते 70 कि.मी. होता. शनिवारी तो 80 ते 90 कि.मी. इतका होणार आहे. मात्र या चक्रीवादळाचा राज्यावर थेट परिणाम दिसणार नाही. पावसाचा अंदाज नाही. मात्र दाट धुके अन्‌‍ थंडी असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
राज्याचे शुक्रवारचे तापमान
बुलडाणा 12.6, अहिल्यानगर 8.3, 9 पुणे 9.5, जळगाव 10, महाबळेश्वर 10.5, नाशिक 10.6, मालेगाव 12.6, सांगली 12.7, सातारा 12.2, सोलापूर 12.8, धाराशिव 12.2, छ. संभाजीनगर 10.6, परभणी 10, अकोला 14.6, अमरावती 14.5, ब्रम्हपुरी 11.6, चंद्रपूर 14.2, गोंदिया 10.9, नागपूर 13.2, वाशिम 13, वर्धा 12.9, मुंबई 21.4, कोल्हापूर 15

Leave a Comment