बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधरण प्रवर्गासाठी खुले

सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता
खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची संख्या वाढणार!
खामगाव (प्रतिनिधी) : साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण (खुल्या) गटासाठी जाहीर केले आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने सर्वच पक्षांत अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काही इच्छूकांनी त्या दृष्टीने रणणिती आखण्यास प्रारंभ देखील केला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील काही महिन्यात होऊ घातल्याची चर्चा असतांनाच राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या सिंहासनासाठीची चूरस अभूतपूर्व राहणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण निर्धारित करण्यात आले. राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने राज्याचे सहसचिव भरोसे यांनी या बाबत परिपत्रक जाही केले आहे. त्यानुसार 16 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. यातील 8 जागा महिलांसाठी राहणार आहे. बुलडाण्याचे अध्यक्षपद खुले निघाल्याने टोकाची चुरस पाहावयास मिळणार आहे. यामुळे महायुती व आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. हे निश्चित!
इच्छूक लागले कामालाः आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीच्या तयारीला आणखी वेग येणार आहे. बुलढाणा जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने विशेषतः खुल्या प्रवर्गातून जि.प.साठी उमेदवारी मिळण्याकरीता इच्छुकांची संख्या वाढणार आहे. अर्थात जि.प. गट रचना व त्यावरचे आरक्षण यावरच सर्व अवलंबून असणार आहे. मात्र इच्छुक आतापासूनच तयारीला लागले आहेत.

Leave a Comment