अखेर माजी आ. सानंदा यांचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा

चर्चेला पूर्णविराम, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली सुरू
खामगाव- खामगाव विधान सभा मतदारसंघाचे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पक्ष सदस्यत्वासह पक्ष संघटनेतील पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. यामुळे सानंदा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
सानंदा यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, मी सन 1985 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा क्रियाशील सदस्य आहे. मी नगरसेवक, नगराध्यक्ष यासह काँग्रेस पक्षाच्या माध्यमात्ूान सन 1999 पर्यंत विविध पदे भूषविलेली आहेत. सन 1999,2004, 2009 या 15 वर्षाच्या कालावधीत पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे मी सलग तीन वेळा आमदार होतो. तसेच पक्षश्रेष्ठीने विश्वास दाखविल्यामुळे खामगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक संस्थेंवर काँग्रेस पक्षाचा झेंडा जनत्ोच्या आशीर्वादामुळे मी फडकवू शकलो याचे मला समाधान आहे. सन 2014 व सन 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला होता. एकूण 5 वेळा काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवुन विधानसभेची उमेदवारी बहाल केली. त्याबद्दल मी सर्व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा सदैव ऋणी राहिल. 40 वर्षापेक्षा जास्त काळ मी काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन वाढविण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केलेले आहे. मी खामगाव विधानसभा मतदार संघाचा काँग्रेस पक्षाचा पक्षनेता असतांना मला विश्वासात न घेता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या व भाजपाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मदत केली. त्यांच्यावरच दि. 26 एप्रिल 2025 रोजी खामगाव येथील सदभावना संकल्प सभेची जबाबदारी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांनी 24 एप्रिल 2025 रोजी नावानिशी सर्व वरीष्ठांना तक्रार केल्यानंतर देखील अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. म्हणून मी माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या क्रियाशील सदस्य पदाचा व माझ्याकडे जी काही काँग्रेस पक्षाच्या संघटनेची पदे असतील त्यांचा अंतकरणाने राजीनामा सादर करीत आहे. सदरचे पत्र मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष, अ.भा. काँग्रेस कमिटी दिल्ली. खा. राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेता, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह आदि पक्षश्रेष्ठींना पाठविले आहे. दरम्यान खामगाव शहर अध्यक्ष सरस्वती खासने व तालुकाध्यक्ष महादेव वानखडे यांनी सुध्दा राजीनामा दिला आहे.