October 20, 2025 5:22 am

लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिला निकषात अडकणार!

घरात चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेस ठरणार अपात्र

खामगाव (प्रतिनिधी): लाडक्या बहिणींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर नसावे, लाभाथ महिलेच्या घरात चारचाकी वाहन नसावे यासह अन्य निकष लागू करण्यात आल्याने लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिला योजनेतून बाहेर पडणार आहेत. महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 1500 रुपयांनी की 2100 रुपयांनी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असताना शासनाने योजनेसाठी नवीन निकष लागू केल्याने अनेक महिला या योजनेतून बाहेर पडणार असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जुलै 2024 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करुन ती राज्यात लागू केली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतिक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन कोटी 40 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरमध्ये लागणार असल्याने महायुती सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रीत दिवाळीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात जमा केले. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले.
दरम्यान महायुतीच्या विधानसभा जाहीरनाम्यात महिलांना महायुतीचे पुन्हा सरकार आले तर 2100 रुपये देवू अशी घोषणा केली आहे. लाडकी बहिण योजनेचा महिलांना थेट लाभ झाल्याने ही योजना महायुतीच्या पथ्यावर पडली. महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने महायुतीला या योजनेचा चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे जुन्या योजनेप्रमाणे 1500 रुपयांनी मिळणार की वाढीव रकमेप्रमाणे 2100 रुपयांनी मिळणार याकडे सर्व महिलांचे डोळे लागले आहेत. शिवाय नवीन निकषामुळे अनेक महिला योजनेतून बाहेर पडणार आहेत.

Gavacha Prashna
Author: Gavacha Prashna