खामगाव (प्रतिनिधी)ः तालुक्यातील लाखनवाडा-आंबेटाकळी रस्त्यावर दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये दोघेही लाखनवाडा येथील रहिवासी असून गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात योगेश ज्ञानेश्वर जावळे (वय 30) व गणेश श्रीराम पांढरे (वय 39) अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, योगेश जावळे हा महान पिंजर येथील सासरवाडीवरून रात्री 8.30 वाजताच्या सुमारास लाखनवाडा येथे दुचाकीने परत येत होता. त्याचवेळी गणेश पांढरे हा कामानिमित्त लाखनवाडा येथून आंबेटाकळीच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. लाखनवाडा-आंबेटाकळी रस्त्यावरील एका वळणावर दोघांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघेही विवाहित असून, योगेश जावळे याच्या मागे एक वर्षाची लहान मुलगी, तर गणेश पांढरे याच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
