October 20, 2025 5:22 am

ऑनलाईन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ बंद

खामगाव (प्रतिनिधी) : शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. मात्र मागील आठवड्याभरापासून शिधापत्रिका व्यवस्थापन (आरसीएमएस) प्रणालीचे संकेतस्थळ बंद आहे. खामगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे. हे संकेतस्थळ केव्हा सुरू होणार? असा सवाल हैराण नागरिक करत आहेत. खामगावात शिधापत्रिका काढणे, नावे चढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी फरपट करावी लागते. तर काहीवेळा दलालाकडून ही नागरिकांची आर्थिक लूट होत होती. असे प्रकार थांबविण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे. शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे ऑनलाईन स्वरूपात केली जात आहेत.
मात्र मागील आठवड्याभरापासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळच बंद आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाईन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत. संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात त्यांना ही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासनाने वरीष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून खामगावकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ऑफलाईन काम होते ते चांगले होते
शिधापत्रिकांची कामे ऑनलाइन केली आहेत. मात्र त्याचे वरीष्ठ स्तरांवरून नियोजन नसल्याने सातत्याने संकेतस्थळ बंद तर कधी चालतच नाही त्यामुळे कामे होत नाही. ऑफलाईनच्या वेळी नावे चढवणे, उतरविणे अशी कामे पटकन होत होती. आता संकेतस्थळ अडचणीमुळे कामे होत नाहीत. त्यामुळे ऑफलाईन होते तेच बरे होते अशी प्रतिक्रिया काही शिधापत्रिका धारकांनी दिली आहे.

Gavacha Prashna
Author: Gavacha Prashna